रत्नागिरीत २१५९ कोटी गुंतवणुकीसाठी करार

सामंत यांची माहिती : जिल्हा गुंतवणूक परिषदेस मोठे यश

    02-Sep-2026
Total Views |

udyog 
रत्नागिरी, 1 सप्टेंबर (आ.प्र.) :
काेकणात उद्याेग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्याेजकांनी औद्याेगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. जिल्हा गुंतवणूक परिषद 2026च्या माध्यमातून जिल्ह्यात 2159 काेटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यात रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या 100 काेटींच्या पंचतारांकित हाॅटेल्ससह माेठ्या औद्याेगिक प्रकल्पांचा समावेश आहे. या वेळी उद्याेगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत उपस्थित हाेते.
 
या परिषदेसाठी जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील उद्याेजक उपस्थित हाेते. सामंत यांच्या उपस्थितीत या वेळी विविध उद्याेगांशी सामंजस्य करार करण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य (हाॅस्पिटॅलिटी) क्षेत्राला बळ देण्यासाठी महत्त्वाच्या घाेषणा करण्यात आल्या. एक्स्प्रेस ग्रुप एमआयडीसीच्या जागेत 100 काेटींची गुंतवणूक करून पंचतारांकित हाॅटेल उभारणार आहे. जयगडला उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हाॅटेलचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, ते लवकरच उद्घाटनासाठी सज्ज हाेत आहे. रत्नागिरी विमानतळाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एटीआर प्रवासी विमान उड्डाण घेईल, असे सामंत यांनी सांगितले.रत्नागिरीचा जीडीपी गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्याेजक, व्यापारी आणि दुकानदारांचा माेठा वाटा आहे. स्थानिक उद्याेजकांनी पुढाकार घेत 2159 काेटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प 100 टक्के पूर्ण करून पुढील वर्षी 5 हजार काेटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू, असे विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.