झोपडीधारकांना मालकी हक्क पटट्यांसह मुलभूत सुविधाही पुरवणार: मुख्यमंत्री फडणवीस

फूट प्रिंट्स ऑफ डिग्रिटी पुस्तकाचे केले प्रकाशन

    02-Sep-2026
Total Views |

Fadanvis 
नागपूर, 1 सप्टेंबर (आ.प्र.) :
झाेपडपट्टीतील रहिवाशांना माेठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे.
मात्र, आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
नागपूर शहरातील झाेपडपट्टीधारकांना हक्काचे मालकी पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रयत्न आणि त्या अनुषंगाने झालेले निर्णय या संपूर्ण प्रक्रियेवर सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या (सीएफएसडी) लीना बुद्धे यांनी लिहिलेल्या फूट प्रिंट्स ऑफ डिग्निटी : बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
नागपुरातील झाेपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले, याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्र्यांचे असल्याची भावना बुद्धे यांनी व्यक्त केली. झाेपडपट्टीधारकांचा प्रश्न अतिशय जुना आहे. ताे फार काेणी समजून घेतला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे करून ठाेस निर्णय घेतले. त्यामुळे मालकी हक्क मिळण्याचा माेठा आनंद त्या रहिवाशांना मिळू शकला. हा सारा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. नागपूर शहरात 12 ते 15 हजार अशा मालकीपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. हे खूप माेठे कार्य असल्याचे बुद्धे यांनी सांगितले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डाॅ. विपीन इटनकर, डाॅ. सुहास बुद्धे, डाॅ. बुद्धे यांचे सहकारी आणि आप्त उपस्थित हाेते.