मुंबई, 1 सप्टेंबर (आ.प्र.) :
न्याय संस्था आणि विधी सेंटर फाॅर लीगल पाॅलिसीच्या वतीने बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत, असे 18 मूलभूत हक्क हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
या कलरिंग बुकचे लाेकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
नॅशनल सेंटर फाॅर परफाॅर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), मुंबई येथे आयाेजित कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डंगरे, माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, अनिशा गाेपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित हाेते. या वेळी संस्थेच्या वतीने राज्यात संविधान फेलाेशिपचाही प्रारंभ करण्यात आला. बालकांच्या हक्कांची माहिती त्यांना लहान वयापासूनच व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे कलरिंग बुक माेफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात निवारा, पाेषण, शिक्षण आणि माेफत कायदेशीर मदतीसह बालकांच्या 18 महत्त्वपूर्ण हक्कांची माहिती देण्यात आली आहे. तसेच, बालविवाह, बालमजुरी, रॅगिंग, बुलिंग आणि लैंगिक शाेषण या विषयांचाही बालकांना समजेल अशा संवेदनशील पद्धतीने समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रमादरम्यान धारावी ड्रीम प्राेजेक्टच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच, बालकांच्या हक्कांवर तयार केलेल्या रॅप गीताचे लाेकार्पण करण्यात आले.