भीतीचे काहीच कारण नसले तर आहे हे नीट चालेल ना ही भीती पाठीमागे लागतेच.
म्हणूनच श्रीसमर्थ जन्माला भयाचा डाेंगर म्हणतात आणि शिवाय ताे कधीच हलतही नाही मग नष्ट हाेण्याची तर बातच नकाे. सद्विद्येच्या अभावाने कुविद्या उत्पन्न हाेते व त्यातूनच वासना बळावतात.
वासनेतूनच जीव जन्माला येताे आणि आयुष्यभर लाेभामुळे गंधमाेहात पडून कमळात अडकलेल्या भुंग्याप्रमाणे त्याची अवस्था हाेऊन ताे शेवटी लाेभातच मरण पावताे. जन्माला येण्यापूर्वी आत्मा मुक्त असताे; परंतु जन्माबराेबर वासना आणि त्यातून निर्माण झालेली भ्रांती म्हणजे देहसुखाचा भम्र यातच ताे गुरफटून जाताे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मज्ञान नसल्यामुळे ताे देह म्हणजेच मी मानत राहताे. त्यामुळे वासनेतून जन्म, जन्मामुळे वासना व वासनेतच मृत्यू व म्हणून पुन्हा जन्म अशा फेऱ्यातच अडकून पडताे.
वासना, त्यामधून अहंकार आणि ‘मी’ पणा या सर्व गाेष्टी जन्माबराेबरच येतात आणि त्यामुळे जन्मल्याबराेबरच माणूस परमेश्वराला विसरून जाताे.
जन्माबराेबरच जीवाला देहाेपभाेगाचा आणि वासना विकारांचा वारा लागताे आणि विषयाची आवड निर्माण हाेते. त्यातूनच सदैव अतृप्तीचा शाप त्याला मिळताे आणि ताे कधीही संपूर्ण समाधानी, तृप्त व संतुष्ट हाेऊ शकत नाही, असे सांगून श्रीसमर्थ मानवी आयुष्य कसे क्षणभंगुर आहे हे सांगतात. ते म्हणतात की, आपण जशी काेवळी काकडी सहजपणे खाताे तित्नया सहजपणे कळीकाळ आपल्या आयुष्याची काकडी भक्षण करून आपला मृत्यू जवळ आणीत असताे. अशा रीतीने श्रीसमर्थ जन्माचे वासना हे कारण व त्यामुळे पुन्हा प्रज्वलित हाेणाऱ्या वासना हे दुष्टचक्र पुन्हापुन्हा समजावून सांगून मुक्ततेसाठीची इच्छा निर्माण करीत आहेत.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299