तैसाचि तया सुखानुभवापाठींŸ। केला द्वैताचा सांभाळु दिठीŸ।
मग उसासाैनि किरीटीŸ। वास पाहलिŸ।। 11.253
अकराव्या अध्यायात अर्जुनाने आपल्या दिव्य दृष्टीने जेव्हा भगवंतांचे विश्वरूप पाहिले तेव्हा त्याच्या मनाची अवस्था काय झाली याचे माेठे प्रत्ययकारी वर्णन ज्ञानेश्वर येथे करीत आहेत. सर्व तेजांची बेरीज केली, तरी ते विश्वरूपाच्या तेजास पुरे पडणार नाही. पण, हे तेज अर्जुनाबराेबर संजयाला मात्र दिसले. देवांच्या सर्व अंगभर अर्जुनाने विश्वरूपच पाहिले. महासागरामध्ये अनेक वेगळे बुडबुडे असतात.
आकाशात ढगांचे आकार असतात. मेरू पर्वतावर असंख्य परमाणू असतात. त्याप्रमाणे सर्व विश्वे अर्जुनाने भगवंतात पाहिली. यावेळी विश्वाला पाहणारे आपण आणि जे पाहायचे ते विश्व असा थाेडासा भेदही नाहीसा झाला. आणि अर्जुनाचे चित्त विश्वरूपात विलीन झाले. त्याच्या अंत:करणात ब्रह्मानंद जागा झाला. इंद्रिये शिथिल झाली. मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीरावर राेमांच उभे राहिले.
जणू पावसाळ्याच्या आरंभी डाेंगरावरून पाणी गळावे व तेथे काेवळे काेंभ उगवावेत, तसे हे राेमांच हाेते. चंद्रकांत मणी चंद्रकिरणांनी पाझरावा, त्याप्रमाणे त्याच्या अंगावर घामाचे बिंदू दाटून आले. अंत:करणातील सुखाच्या लाटांनी त्याचे सर्व अंग कापत हाेते.
कापूरकेळीच्या गाभ्यातून साेपेटी निघाल्यावर ज्याप्रमाणे कापराचे कण गळतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या डाेळ्यांतून आनंदाचे अश्रू गळू लागले.
अष्टसात्त्विक भाव जागे हाेऊन ब्रह्मानंदाचे राज्य निर्माण झाले. चंद्राेदयाने समुद्रात जशा लाटा येतात, त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त उचंबळून आले. या अनुभवानंतर भगवंतांनी कृपावंत हाेऊन आपण देव व अर्जुन भक्त हे द्वैत सांभाळले. अर्जुनाने माेठ्या प्रेमाने श्रीकृष्णांकडे पाहिले.