विसर्जनानंतर गणेशमूर्तीचे छायाचित्रण केल्यास कारवाई

    18-Sep-2026
Total Views |
 
Ganeshotsav
ठाणे, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा अर्धवट विरघळलेल्या गणेशमूर्तींचे फाेटाे काढणे, तसेच छायाचित्रे प्रकाशित अथवा प्रसारित करण्यासाठी ठाणे पाेलिसांनी प्रतिबंध केला आहे. ठाणे शहर पाेलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी हा आदेश जारी केला आहे. हा आदेश 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टाेबर या कालावधीत ठाणे पाेलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे.
 
गणेशाेत्सवादरम्यान विविध दिवशी गणपती आणि गाैरींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदा 15, 16, 18, 19, 20, 21, 22 आणि 25 सप्टेंबरला गणपती व गाैरी मूर्तींचे विसर्जन हाेणार आहे. याशिवाय 26 सप्टेंबरला 13 दिवसांच्या आणि 4 ऑक्टाेबरला 21 दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन हाेणार आहे. विसर्जनानंतर काही मूर्ती पूर्णपणे विरघळत नाहीत.
 
अशा अर्धवट विरघळलेल्या मूर्ती किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे कर्मचारी मूर्ती गाेळा करीत असतानाचे फाेटाेही घेतले जातात. अशा छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावण्याची, शांतता आणि सामाजिक सलाेखा भंग हाेण्याची शक्यता असल्याचे पाेलिसांनी आदेशात नमूद केले आहे.