नाशिककडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीचे नियोजन करणार

कुंभमेळ्यानिमित्त शेजारील जिल्ह्यांकडून मागवली माहिती

    18-Sep-2026
Total Views |

KumbhMela 
नाशिक, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीचे नियाेजन केवळ शहरापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रादेशिक पातळीवर करण्यासाठी नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने विभागीय आयु्नत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयु्नत शेखर सिंह यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. शेजारील जिल्ह्यांसह गुजरातमधील वलसाड व डांग जिल्ह्यातील अधिकारी, आणि विविध संबंधित यंत्रणांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील तयारीची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती पुढील 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.
 
कुंभमेळ्याच्या काळात नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील मार्गांवर माेठ्या प्रमाणात भाविक व वाहनांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था, पर्यायी मार्ग, वाहनतळ, सार्वजनिक वाहतूक, आराेग्य सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांचा आधीच एकत्रित आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून माहिती संकलित केली जाणार आहे.
 
नाशिक व त्र्यंबककडे येणाऱ्या प्रमुख मार्गांचे जिल्हानिहाय नकाशे, पर्यायी मार्ग; तसेच आपत्कालीन स्थितीत वापरता येणाऱ्या मार्गांची माहिती मागवण्यात आली आहे. त्याचबराेबर उपलब्ध पार्किंग व वाहन हाेल्डिंग क्षेत्रांची ठिकाणे आणि प्रत्येक ठिकाणी किती वाहने उभी राहू शकतात, याचा तपशीलही सादर करावा लागणार आहे. संबंधित जिल्ह्यांतील बस स्थानके, एसटी आगार, रेल्वे स्थानके; तसेच तेथील सध्याची क्षमता, कुंभमेळ्यासाठी वाढवता येणारी अतिर्नित क्षमता, वाहन पार्किंग आणि प्रवाशांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधांची माहितीही मागवण्यात आली आहे.
 
शेजारील जिल्ह्यांकडून मिळणारी ही माहिती कुंभमेळा प्राधिकरणाकडून एकत्रित करून प्रादेशिक स्तरावरील नियाेजनासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळात भाविक नाशिकच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्या वाहतुकीचे नियमन, वाहनांची हाताळणी, पर्यायी मार्गांची उपलब्धता आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत अधिक समन्वयाने निर्णय घेणे शक्य हाेणार आहे.