मुंबई, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यात माेसमी पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम धाेक्यात आल्याने 5 ऑक्टाेबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पंचनामे ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू हाेणार असले, तरीही टंचाई निवारणाच्या उपाययाेजनांची तातडीने अंमलबजावणी हाेईल. दरम्यान, देशातून माेसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थानातून 19 सप्टेंबरपासून सुरुवात हाेण्याची शक्यता आहे. देशभरात 1 जून ते 14 सप्टेंबरदरम्यानच्या 15 टक्के पावसाची तूट, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 16 टक्के आहे.
माेसमी पावसाने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ओढ दिल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला असून, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार दुष्काळी स्थितीचे पंचनामे 5 ऑक्टाेबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली आहेत.
सिंचनाची साेय नसलेल्या ठिकाणी पिकांची काढणी करून काही हाती लागेल, अशी स्थिती नाही. उसाची वाढ खुंटली आहे. उसाच्या नव्या लागणी पाण्याअभावी अडचणीत आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, अशी एकमुखी आग्रही मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे साेमवारपासून मराठवड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. अकाेला, वाशीम, हिंगाेली आणि नांदेड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाहणी करतील. दुसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि साेलापूर जिल्ह्यात पाहणी करणार आहेत.