मुंबई, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन जगभरातील पर्यटकांना घडवणाऱ्या गणेशाेत्सवाच्या निमित्ताने विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील विविध मंडळांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यात फिनलंड, फ्रान्स, थायलंड, नाॅर्वे, चीन, बेल्जियम, स्वीडन आणि इजिप्त या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश हाेता. महाराष्ट्राचा गणेशाेत्सव, त्याची ऐतिहासिक परंपरा आणि मुंबईतील प्रसिद्ध मंडळांची माहिती या प्रतिनिधींना देण्यात आली.
गणेशाेत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, सामाजिक एकतेचे आणि लाेकसहभागाचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा, इतिहास, लाेकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पाेहाेचते आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. माटुंग्यातील खालसा महाविद्यालयात परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी विविध मंडळांतील गणेशाचे दर्शन घेतले. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गाेयल यांनी परदेशी मान्यवरांचे आभार मानले.