मुंबई, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्याेगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी हाेण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डाॅक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे 90 हजार राेजगार निर्मिती हाेणार आहे.
या प्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्रा, प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी उपस्थित हाेते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅ. जगमाेहन, तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
राज्यात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने संयु्नतपणे नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्राच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, ताे मेरीटाइम अमृत काल व्हिजन 2047च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे. एमडीएलने दिघीत प्रतिवर्ष किमान 1.2 दशलक्ष सकल टनभार (ग्राॅस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट नििशिचत केले आहे. यासाठी सुमारे 15 हजार काेटींची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे माेठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य हाेणार असून, देशाच्या सागरी औद्याेगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे.