सिरोंचाला वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था

संचालक औंढेकर यांच्याकडून वीजयंत्रणेच्या कामांचा आढावा

    17-Sep-2026
Total Views |
 
Veej
गडचिराेली, 16 सप्टेंबर (आ.प्र.) :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक मंत्री असलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिराेंचा तालुक्याला आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तेलंगणातून पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी महापारेषण व महावितरणकडून वीजयंत्रणेची उभारणी वेगाने सुरू आहे.
 
महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी या कामांची पाहणी केली. गडचिराेलीपासून सुमारे 250 किमीवर असलेला सिराेंचा तालुका अत्यंत दुर्गम पण भाैगाेलिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
 
या तालुक्याच्या पूर्वेला छत्तीसगड आणि दक्षिणेला तेलंगणा आहे. महावितरणचे या तालुक्यात घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक, कृषी व इतर असे 13928 ग्राहक आहेत.
 
सिराेंचात महापारेषणच्या उपकेंद्रातून महावितरणच्या पाच उपकेंद्रांना आणि तेथून संपूर्ण तालुक्याला सुमारे 22 मेगावाॅट विजेचा पुरवठा केला जाताे.
 
महापारेषणच्या सिराेंचा उपकेंद्राला आलापल्लीतील उपकेंद्रातून 93 किमीच्या 66 केव्ही वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जाताे. जीमलगट्टाचे घनदाट जंगल, नद्या व नाल्यांमुळे पावसाळ्यात संपर्क तुटत असल्याने या वीजवाहिनीतील बिघाड शाेधणे व ताे दुरुस्ती करणे जिकिरीचे आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याच्या पर्यायी व्यवस्थेची उपाययाेजना म्हणून सिराेंचातून 32 किमीवर असलेल्या तेलंगणातील किस्तमपेठ (जि. मंचेरियल) येथून सिराेंचापर्यंत टाॅवर उभारून अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीचे काम महापारेषणने सुरू केले आहे. येत्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
 
सिराेंचातील महापारेषणच्या उपकेंद्राच्या ठिकाणी क्षमतावाढीचे काम पूर्ण झाले आहे. या कामांची औंढेकर यांनी पाहणी केली. महावितरणच्या उपकेंद्रांतही नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. यात सिराेंचा 33/11 केव्हीचे नवीन उपकेंद्र सुरू झाले आहे. या उपकेंद्रात दाेन पाॅवर ट्रान्सफाॅर्मर आहेत. तेथे आणखी एक पाॅवर ट्रान्सफाॅर्मर लावण्याची सूचना औंढेकर यांनी केली. सिराेंचा तालुक्याला आलापल्ली व किस्तमपेठ (तेलंगणा) या दाेन्ही ठिकाणांहून वीजपुरवठ्याची साेय उपलब्ध हाेणार असल्याने तालुक्यातील 140 दुर्गम व अतिदुर्गम गावांतील सुमारे 75 हजार नागरिकांना आणखी सुरळीत वीजपुरवठा हाेणार आहे.