श्री दासबोध नित्यपाठ

त्यागावया अवगुण। बोलिले पढतमूर्खाचे लक्षण। विचक्षणे नीववावे पूर्ण ।।२।।

    17-Sep-2026
Total Views |
 
RamdasSwami
जाे दिलेले वचन सहजपणे व खंतही न वाटता माेडताे आणि जाे परस्वाधीन असताे ताे पढतमूर्खच समजावा. ताे रात्रंदिवस चांगले वाचन व चांगल्या गाेष्टींचे श्रवण करूनही त्यातील उपदेशाप्रमाणे आपले अवगुण साेडीत नाही आणि ज्याला स्वत:चे हित कशात आहे तेही कळत नाही व खरे तर त्याला कधी कधी स्वहिताची गाेष्ट कळते पण ती आचरणात आणण्याचा ताे प्रयत्न करीत नाही.
 
माेठेपणा व ज्ञान मिळाल्यावर जाे गुरूला विसरताे आणि स्व:लाच गुरूहूनही श्रेष्ठ समजू लागताे, अवज्ञा करणाऱ्या शिष्यालाही चुचकारू पाहाताे, गुरू परंपरा सांगावयास ज्याला कमीपणा वाटताे, ताेही पढतमूर्खच असताे.
 
ताे आपल्या ज्ञानाचा उपयाेग केवळ स्वार्थासाठी करताे आणि एखाद्या अत्यंत चिक्कू माणसाप्रमाणे पैसा पैसा करून धनसंचय करीत राहताे, तसेच परमार्थ मला साधला. मी परमार्थी आणि विरागी झालाे असे सांगून लाेकांना परमार्थाच्या गप्पा मारताे आणि त्याचा उपयाेग पैसे मिळविण्यासाठी करताे, त्याला खरे म्हणजे काहीच साधलेले नसून ताे पढतमूर्खच असताे. स्वत:चे वागणे न सुधारता केवळ लाेकांना उपदेश करणारा, स्वत: ब्रह्मज्ञानी नसूनही ते लाेकांना शिकवण्याचा व्यर्थ खटाटाेप करणारा आणि गाेसावी असूनही परतंत्र व परस्वाधीन असलेला हेही पढतमूर्खच आहेत, असे सांगून श्रीसमर्थ या समासाच्या उपसंहाराकडे वळतात.
 
ते म्हणतात संसारातच सर्व सुख आहे असे समजणारा माणूस मूर्खश्रेष्ठ आहे. तेव्हा ही लक्षणे मी तुम्हाला बाेध व्हावा व तुम्ही त्याचा त्याग करावा म्हणून सांगितली आहेत. त्याचा अभ्यास केला तर तुम्ही निश्चितपणे ती साेडून देऊ शकाल व खरेखुरे ज्ञानी व शहाणे हाेऊ शकाल अशी खात्री आहे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299