आपण काेणतेही कृत्य करीत असताना, ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डाेळ्यांसमाेर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे.
वास्तविक आपण भगवंताचे आहाेतच; पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत ‘तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस’ असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे ‘मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे,’ असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे; आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुनःपुन्हा मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.
तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता; पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे; रामाला पक्के ओळखता आले पाहिजे; याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे; शुद्ध भाव पाहिजे. काही साधने केली पण भाव नसेल; तर ती व्यर्थ हाेतात.
कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न हाेईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर हाेते. नवविधा भक्तींमध्ये साेपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पणच हाेते. खरी एकाग्रता हाेण्यासाठी सर्वांभूती भगवद्भाव ठेवला पाहिजे. मी तुमच्याकरिता सर्व काही करताे आहे; तुम्हाला जे काही हाेईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करताे असे का मानीत नाही? अग्नीचा उपयाेग ताे करून घेणाऱ्यांवर आहे; तसा देवाचा उपयाेग जसा करावा तसा हाेताे.
परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात, आणि सिद्धी तर त्याज्य; मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय? तर, ध्यान सिद्धी मिळविण्याकरिता करू नये, परमेश्वर-प्राप्तीकरिता निष्काम बुद्धीने ध्यान करावे; म्हणजे परमेश्वर सिद्धींचे अडथळे दूर करताे.
साधू सिद्धींचा उपयाेग कधीही करीत नाहीत. ते परमात्मस्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गाेष्टी ते परमात्म्यावर साेपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते. साधूजवळ कधीही व्यावहारिक गाेष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर साेपवाव्यात.