कृषी विभागाचा आकृतिबंध अखेर रद्द : कृषिमंत्री भरणे

    17-Sep-2026
Total Views |
 
Krushi
मुंबई, 16 सप्टेंबर (आ.प्र.) :
17 वर्षांनंतर तयार करण्यात आलेला कृषी विभागाचा आकृतिबंध अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या प्रखर विराेधानंतर रद्द करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा आकृतिबंध अधिकृतपणे रद्द करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
 
मंजूर झालेला आकृतिबंध तांत्रिक प्रवर्गावर अन्याय करणारा, शेतीच्या बांधावरील मनुष्यबळ कमी करून आस्थापना शाखेला बळ देणारा, आस्थापना शाखेला अतिर्नित मनुष्यबळ पुरवणारा असल्याचा आक्षेप घेत राज्य कृषी सेवा महासंघाने या आकृतिबंधाला विराेध केला हाेता. महासंघाच्या मागणीचा विचार करून कृषिमंत्र्यांनी आकृतिबंध रद्द केल्याची घाेषणा केली. कृषी विभागाचा विस्तार माेठा आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार कामकाजासाठी आकृतिबंध तयार करण्यात आला हाेता.
 
मात्र, टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या मागण्या समाेर येत आहेत. आम्ही समजूत काढूनही त्यातून मार्ग निघत नाही. त्यामुळे विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहमत नसतील, तर आकृतिबंध त्यांच्यावर लादणार नाही.
 
नव्याने आकृतिबंध करण्याबाबत समिती नेमावयाची की अन्य काेणता पर्याय आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.