नवी मुंबई, 10 सप्टेंबर (आ. प्र.) :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यानंतर अवघ्या आठ महिने आठ दिवसांत 30 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला. 25 डिसेंबर 2025 राेजी सेवा सुरू झाल्यानंतर 200 दिवसांपेक्षा कमी कालावधीत विमानतळावरून अबुधाबीला नियाेजित आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू झाली. विमानतळावरील गंतव्यस्थानांची संख्या आता 13 वरून 46 झाली असून, सुमारे 22500 व्यावसायिक विमानफेऱ्या हाताळण्यात आल्याची माहिती नवी मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली.
ऑगस्टमध्ये विमानतळावर सरासरी 94 टक्के प्रवाशांना त्यांची शेवटची सामानाची बॅग निर्धारित वेळेत मिळाली. प्रवाशांना सुरळीत सेवा देण्यावर विमानतळ प्रशासनाचा भर असल्याचे या कामगिरीतून स्पष्ट हाेते. मुंबई महानगर प्रदेशाला देशातील प्रमुख शहरांशी जाेडण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या हवाई मार्गिकांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. यापुढे उदयपूर, जाेधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी आणि सिंधुदुर्ग या सहा नव्या देशांतर्गत गंतव्यस्थानांचा समावेश हाेणार आहे. त्यामुळे या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावरून अधिक हवाई पर्याय उपलब्ध हाेतील. हिवाळी वेळापत्रक सुरू हाेण्यापूर्वी नाेव्हेंबरमध्ये नव्या विमान कंपन्या आणि हवाई मार्गिकांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काचा आणखी विस्तार करण्याचे विमानतळ कंपनीचे नियाेजन आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त हवाई मार्गिका आणि विमान कंपन्यांच्या भागीदारीच्या माध्यमातून देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील हवाई संपर्क आणखी चांगले करण्याबराेबरच पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून या विमानतळाची ओळख निर्माण हाेण्यासाठी नियाेजन केले जात आहेत. पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक नऊ काेटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. प्रारंभीच्या टप्प्यात दाेन काेटी प्रवाशांची वार्षिक क्षमता विकसित करण्यात आली आहे. तसेच, दर वर्षी पाच लाख टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता उपलब्ध हाेणार आहे.