नवी मुंबई, 10 सप्टेंबर (आ. प्र.) : शाळा- महाविद्यालयांच्या 50 मीटर परिसरात पानटपरी दिसता कामा नये, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ.
कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या वापराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण कारवाईच्या सूचना पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या कारवाईसाठी पाेलिसांनी पालिका यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आयुक्तांनी सांगितले.
शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि बाजार परिसरातील पदपथांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या विद्यार्थी माेठ्या प्रमाणावर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे. रेल्वे स्थानक आणि परिसरातील अमली पदार्थांची विक्री व वापर राेखण्यासाठी पाेलिसांनी पुढाकार घेऊन पालिकेच्या सहकार्याने नियमित कारवाई करावी, असे आयुक्तांनी सांगितले.