पावसाळ्यात कानाच्या मागे सतत खाज का सुटते, हे जाणून घ्या

    11-Sep-2026
Total Views |
 
earinfection
पावसाळ्यातील दमट वातावरणामध्ये फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) हाेण्याचा धाेका वाढताे. त्यामुळे कानाच्या मागे व आत खाज सुटण्याची समस्या बळावते.
 
डायबेटीसचे रुग्ण, प्रतिकारश्नती कमजाेर असलेले लाेक आणि त्वचेचे आजार असलेल्या लाेकांना याचा धाेका अधिक राहताे. माॅन्सूनमुळे उन्हाळ्यातून आराम मिळत असला तरी त्यासाेबत आराेग्याच्या अनेक समस्याही येतात.
 
या दिवसांत जर तुम्हाला कानात किंवा कानाच्या मागे सतत खाज सुटत असेल, कान जड वाटत असेल किंवा दुखत असेल तर याला सामान्य दुखणे मानून दुर्लक्ष करू नका. अशा दमट वातावरणामुळे फंगल इन्फेक्शन हाेण्याचा धाेका वाढताे. पावसाळ्याच्या ऋतूत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण या प्रकारच्या संसर्गासाठी कारणीभूत ठरणारे घटक आहे.
 
आपल्या कानात नैसर्गिक संरक्षक आवरण असते. पावसाळ्यात वारंवार भिजल्यामुळे, स्विमिंग केल्यामुळे किंवा कानात काॅटन-बड्स अथवा इअर-बड्स घातल्यामुळे त्या आवरणाला नुकसान पाेहाेचते. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्याचे दमट हवामान बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असल्यामुळे कान आणि त्याच्या आसपासच्या परिसरात संसर्ग वेगाने पसरताे. परिणामी, खाजेची समस्या वाढते. अनेक लाेक सुरुवातीची लक्षणे ओळखू शकत नाहीत आणि घरगुती उपाय करू लागतात. ज्यामुळे स्थिती आणखी बिघडू शकते. कानाच्या आत आणि मागच्या भागात सतत खाज सुटणे, कानातून स्राव निघणे, आजूबाजूची त्वचा काेरडी हाेऊन खवले निघणे, कान बंद झाल्यासारखे वाटणे, अस्वस्थता किंवा वेदना हाेणे, ऐकण्यात त्रास हाेणे यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. हा संसर्ग काेणालाही हाेऊ शकताे; पण डायबेटीसचे रुग्ण, कमजाेर प्रतिकारश्नती असलेले लाेक आणि त्वचेचे आजार असलेल्या लाेकांना याचा धाेका अधिक असताे. याशिवाय जे लाेक नियमित स्विमिंग करतात, तासन् तास इअर-फाेन्स कानात अडकवून ठेवतात, कान साफ करण्यासाठी टाेकदार वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे कानाच्या आत बुरशी सहज प्रवेश करू शकते आणि संसर्ग हाेऊ शकताे.
 
कानातील मळ हा कचरा नसून ताे धूळ, बॅक्टेरिया आणि बुरशीविरुद्ध कानाचे संरक्षण करणारे नैसर्गिक कवच आहे. ताे वारंवार साफ करण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत. अंघाेळ केल्यानंतर कानाचा बाहेरील आणि मागचा भाग मऊ कापडाने हलक्या हाताने पुसून काेरडा करा.