मुंबई, 10 सप्टेंबर (आ. प्र.) :
विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयपूर्तीसाठी आराेग्य क्षेत्र आधारस्तंभ ठरणार असून, वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशाेधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्र विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) आयाेजिलेल्या सीआयआय हाॅस्पिटल टेक 2026 परिषदेत रावल बाेलत हाेते. या वेळी डाॅ. रमाकांत देशपांडे, जाॅय चक्रवर्ती, साैरभ अग्रवाल, रिझवान काेईटा, ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, नेदरलॅण्डचे वाणिज्य दूत थिअरी वॅन हेल्डन, तसेच आराेग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते.
राजशिष्टाचार विभागामार्फत परकीय गुंतवणूक, प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क आणि परदेशी दूतावासांशी समन्वय वाढवून महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे रूपांतर गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ज्ञान भागीदारीत करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, जगभरातील महाराष्ट्रीय डाॅक्टर, संशाेधक आणि आराेग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा उपयाेग संशाेधन, तंत्रज्ञान हस्तांतर आणि नव्या आराेग्य उपक्रमांसाठी केला जाणार असल्याचे रावल यांनी नमूद केले.
भारतीय व आंतरराष्ट्रीय उद्याेग, रुग्णालये, संशाेधन संस्था, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवाेन्मेषकांनी महाराष्ट्रात संशाेधन, नवाेन्मेष आणि गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही रावल यांनी केले.