एजेंटिक एआय व क्वांटम तंत्रज्ञानातून वित्तीय क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची संधी

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

    11-Sep-2026
Total Views |

AI 
मुंबई, 10 सप्टेंबर (आ. प्र.) :
डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्याेजक, स्टार्ट अप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेगांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
येथे आयाेजित ग्लाेबल फिनटेक फेस्टमध्ये बाेलताना मुख्यमंत्र्यांनी एजंटिक एआय, टाेकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात माेठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता अधाेरेखित केली. ग्लाेबल फिनटेक फेस्टचे अध्यक्ष क्रिस गाेपालकृष्णन, नॅशनल पेमेंट काॅर्पाे रेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक साेहिनी राजाेला, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे आदी या वेळी उपस्थित हाेते.
 
एजेंटिक एआयच्या माध्यमातून वित्तीय सेवांना नवी दिशा मिळणार आहे. भविष्यात एखाद्या उद्याेजकाचा एआय सहायक त्याच्या आर्थिक गरजा ओळखून याेग्य वित्तीय पर्याय सुचवू शकेल. शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत आर्थिक सल्ला मिळू शकेल. मात्र, एआय नागरिकांसाठी काम करत असले, तरी अंतिम नियंत्रण नागरिकांच्याच हातात राहिले पाहिजे, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि सेबी, नॅशनल स्टाॅक एक्सचेंज, तसेच एन्फाेर्समेंट डायरेक्टरेटदरम्यान बीकेसीमध्ये विस्तार करण्याबाबतच्या कराराचे हस्तांतरण करण्यात आले.