ब्रिटिश संसदेमध्ये दुमदुमला 'जय महाराष्ट्र'चा निनाद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

    11-Sep-2026
Total Views |

AI 
लंडन, 10 सप्टेंबर (आ. प्र.) :
जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ लाॅर्डस) ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त हाेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘काॅमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे.
 
शिंदे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पुढच्याच क्षणी या ऐतिहासिक सभागृहात मराठीचा गजर झाला. विशेष म्हणजे या वेळी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्कार- जय महाराष्ट्र अशी मराठीतून करून शिंदे यांनी भाषेचा अभिमान तर व्यक्त केलाच, पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई-पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई आणि लंडन ही दाेन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून, फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्राेजन, डीप-टेक आणि काैशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला माेठी संधी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 
यूके एशियन बिझनेस काैन्सिल आणि कॅनव्हास फाॅर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पसच्या विद्यमाने हाऊस ऑफ लाॅर्ड्समध्ये पार पडलेल्या या साेहळ्यात उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर आर्लेन फाॅस्टर आणि यूके एशियन बिझनेस काैन्सिलचे चेअरमन अँड्र््यू ग्राेकाॅक, काैन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे, संसदेच्या दाेन्ही सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापाैर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्याेजक आणि काॅमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित हाेते.
 
वाढवण बंदरापासून समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई काेस्टल राेडपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डाॅलरची करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच, ब्रिटिश उद्याेगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रणही त्यांनी दिले.