तम आणि रज यांच्या त्यागाने सत्त्वगुण अंगी येतात आणि सत्त्वगुणांची पुढची साध्यता म्हणजेच विरक्ती हाेय. विरक्ताचे वागणे कसे असावे आणि असते हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात की, त्याने धर्माने व नीतिन्यायाने वागावे. नेहमी नवनवीन विचारांचा आणि ज्ञानाचा धांडाेळा घ्यावा.
त्याने भाविकजनांना सांभाळून मार्गदर्शन करावे आणि त्याचबराेबर जे भाेळेभाबडे अज्ञानी असतील त्यांनाही दूर न लाेटता जवळ करून आपलेसे करावे.
त्याने सावध असून बहुत जनांचे अंतरंग ओळखून वागावे आणि सदैव सज्जनांचा पक्ष घेऊन दुर्जनांनाही सुधारण्याचा प्रयत्न करावा. त्याने सतत ज्ञानरत, अभ्यासू आणि बहुश्रुत असावे. काेणीही माणूस सर्वच ज्ञान मला आले आहे असे म्हणू शकत नाही. शिकणे ही सतत चालणारी आणि कधीही न पूर्ण हाेणारी प्रक्रिया आहे. म्हणून विरक्त जरी झाला तरी त्याने ‘अभ्यास करावा’ हा श्री समर्थांचा आग्रह आहे.
त्याने सर्वच प्रकारचे ज्ञान संपादन करावे. त्यांचा वक्तृत्वकलेवर माेठा भर आहे. ज्याला काेणतेही कार्य करावयाचे आहे त्याला आपले म्हणणे दुसऱ्याच्या मनावर बिंबवून पटवून सांगता आले पाहिजे आणि त्यासाठी वक्तृत्व आवश्यक आहे.
विरक्तानेही उत्तम वक्ता असलेच पाहिजे आणि त्याने आपल्या अमाेघ वाणीने लाेकांना वळवून घेऊन परमार्थाची पुनर्स्थापना करावी असे त्यांचे सांगणे आहे.