ठाणे, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
उत्सव साजरा करताना इतरांना त्रास किंवा गैरसाेय हाेणार नाही याची काळजी घेऊन संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलाेखा जपावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशाेत्सव मंडळांना दिला. गणेशाेत्सव केवळ देखावे, आरास आणि राेषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबाेधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ठाणे गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण साेहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिंदे यांच्या हस्ते झाला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापाैर शर्मिला पिंपळाेलकर, अभिनेता अजिंक्य देव, प्रा. प्रदीप ढवळ आदी मायवर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री असताना सण-उत्सवांवरील निर्बंध दूर करून मंडळांना परवानग्या आणि मंडप शुल्काबाबत सुलभता आणली. आपली संस्कृती आणि परंपरा उत्साहाने साजरी करता यावी, हा त्यामागील उद्देश हाेता.
मंडळांमधील तरुण कार्यकर्त्यांच्या नियाेजन काैशल्याला, कल्पकतेला आणि कलागुणांना गणेश दर्शन स्पर्धेतून व्यासपीठ मिळते. आर्किटेक्चर, इंजिनिअरिंगसह विविध काैशल्यांना यातून वाव मिळत असल्याने मंडळांना प्राेत्साहन देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.