सहा फुटांखालील गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

मिरा-भाईंदरमध्ये विसर्जनासाठी महापालिकेची व्यापक व्यवस्था

    10-Sep-2026
Total Views |

ganesh 
भाईंदर, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
गणेशाेत्सवात बाप्पाला भावपूर्ण निराेप देण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने यंदा शहरात 24 विसर्जन स्थळे सज्ज केली आहेत. यात पाच नैसर्गिक जलस्राेत आणि 19 कृत्रिम तलावांचा समावेश आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सहा फुटांपेक्षा माेठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्राेतांत, तर सहा फुटांखालील मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
 
शहरात दरवर्षी सुमारे 12 हजार घरगुती गणेशमूर्ती व जवळपास 400 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या सर्व मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे. भाविकांना आपल्या परिसरातून जवळच्या विसर्जनस्थळी मूर्ती नेता यावी आणि विसर्जनावेळी गर्दी हाेऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. माेठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी उत्तन समुद्रकिनारा, भाईंदर पश्चिम खाडीकिनारा, भाईंदर पूर्व खाडीकिनारा, घाेडबंदर रेतीबंदर खाडीकिनारा आणि चेना नदी ही पाच नैसर्गिक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय आठ मैदानांवर तात्पुरते कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत.
 
दरम्यान, मागील वर्षी मुर्धा गावात नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन केल्याप्रकरणी काही गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. त्यामुळे यंदा मुर्धा गावातील नैसर्गिक तलावातच स्वतंत्र विसर्जनाची साेय करण्यात येईल. त्यामुळे गावकऱ्यांना नियमांचे पालन करून त्याच ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करता येईल.
 
मागील वर्षी शहरात एकूण 19167 गणेशमूर्ती आणि गाैरींचे विसर्जन झाले हाेते. यंदा विसर्जनाच्या संख्येत वाढ हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. विसर्जनादरम्यान भाविकांना थेट पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी पाेलीस पथके तैनात राहणार आहेत. सर्व विसर्जन स्थळांवर रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत.