मुंबई, 31 ऑगस्ट (आ.प्र.) :
देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी उत्पादित हाेणारी अतिर्नित वीज साठवून ठेवण्यासाठी केंद्र सरकार बॅटरी स्टाेरेज यंत्रणा विकसित करणार आहे. त्यामुळे ग्रीडला घेता न आल्याने वाया जाणारी अतिर्नित साैर आणि पवन ऊर्जा साठवता येईल आणि ग्रीडवर ताण येणार नाही, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जाेशी यांनी दिली.
त्याचबराेबर सुमारे 226 गीगावाॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प दृष्टिपथात असून, या क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी उद्याेगांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जाेशी यांनी उद्याेजकांना केले.
साैर आणि पवन ऊर्जेची अतिर्नित निर्मिती हाेत असताना ग्रीडची क्षमता अपुरी पडते. मागणीपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ती वाया जाण्याची शक्यता असते.
अशावेळी प्रकल्पांवर बॅटरी बसवून अतिर्नित वीज साठवावी आणि मागणी वाढल्यावर ती ग्रीडमध्ये साेडावी, अशी केंद्राची याेजना आहे. ती अद्याप प्राथमिक टप्प्यावर असून, त्यासाठी नियामक संस्थांची मान्यता आणि नियमावली करावी लागणार असल्याचे जाेशी यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीत 2 ते 5 नाेव्हेंबर दरम्यान हाेणाऱ्या भारत रिन्युएबल एनर्जी (आरई) परिषदेच्या निमित्ताने या क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी जाेशी यांनी संवाद साधला. राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित हाेते.
देशाची बिगर-जीवाश्म इंधनाधारित वीजनिर्मिती क्षमता सुमारे 302 गीगावाॅटवर पाेहाेचली आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी ही क्षमता 80 गीगावाॅटच्या आसपास हाेती. मार्चमध्ये 300 गीगावाॅटचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य हाेते. प्रत्यक्षात हे लक्ष्य सुमारे महिनाभर उशिराने गाठण्यात आले. आता अक्षय ऊर्जा क्षेत्रातील विस्तार आणखी वेगाने हाेणार आहे. सुमारे 226 गीगावाॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प दृष्टिपथात असून, त्यापैकी सुमारे 150 गीगावाॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात आहेत. आणखी 70 ते 76 गीगावाॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जाेशी यांनी दिली.
अक्षय ऊर्जा ज्या भागात निर्माण हाेते, तेथून ती मागणी असलेल्या भागात पाेहाेचवण्यासाठी सक्षम वीज पारेषण व्यवस्था आवश्यक आहे. ग्रीन एनर्जी काॅरिडाॅर अंतर्गत आतापर्यंत 10 हजारांहून अधिक सर्किट किलाेमीटरच्या पारेषण वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्याचे जाेशी यांनी सांगितले.
ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीतही माेठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर प्रकल्प येत असल्याने त्यासाठी भांडवल, तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि ऊर्जा साठवणूक यंत्रणेची आवश्यकता वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर उद्याेगांनी देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील संधी ओळखून गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जाेशी यांनी केले.