पुणे, 6 ऑगस्ट (आ.प्र.) :
ग्लासगाेत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात समावेश असलेल्या लष्करातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत 16 पदके पटकावली. त्यात आठ सुवर्ण, सात राैप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.
लष्करातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशात लष्कराच्या आर्मी स्पाेर्ट्स इन्स्टिट्यूटचे महत्त्वाचे याेगदान असल्याची माहिती लष्कराने येथे दिली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 39 पदके पटकावली. त्यात 13 सुवर्ण, 17 राैप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय संघाने पदकतालिकेत चाैथे स्थान मिळवले. भारतीय संघात लष्करातील 20 खेळाडूंचा समावेश हाेता. ज्युदाे, बाॅक्सिंग, थलेटिक्स, पॅरा थलेटिक्स, वेटलिफ्टिंग अशा क्रीडा प्रकारांत लष्करातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 16 पदके पटकावली.
पुण्यातील आर्मी स्पाेर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षित खेळाडूंनी 6 सुवर्ण, 5 राैप्य आणि 1 कांस्य, अशी एकूण 12 पदके जिंकण्याची कामगिरी केली. त्यातही लष्कराच्या बाॅक्सिंग खेळाडूंनी आठ पदकांची कमाई केली. क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ता ओळखून खेळाडूंची जाेपासना करणे, खेळाडू विकसित करण्यासाठी लष्करातर्फे 2001 मध्ये आर्मी स्पाेर्ट्स इन्स्टिट्यूटची पुण्यात स्थापना करण्यात आली. दाेन दशकांनंतर आता देशातील सर्वाधिक यशस्वी, उच्च कामगिरी परिसंस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. पारंपरिक प्रशिक्षण केंद्रांपेक्षा वेगळ्या प्रशिक्षणासह खेळाडूंच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी उत्कृष्ट प्रशिक्षक, क्रीडा विज्ञान, फिजिओथेरपी, आहार, बायाेमेकॅनिक्स, पुनर्वसन व्यवस्थापन, कामगिरीचे विश्लेषण, अशा विविध अंगांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले जाते. या सर्वसमावेशक दृष्टिकाेनामुळे आर्मी स्पाेर्ट्स इन्स्टिट्यूट देशातील महत्त्वाची क्रीडा संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत हवालदार हर्ष यांनी ज्यूदाेमध्ये, नायब सुभेदार प्रीती आणि जस्मीन, हवालदार साक्षी, अरुंधती, सचिन, अंकुश यांनी बाॅक्सिंगमध्ये, सुभेदार साेमन राणा यांनी पॅरा शाॅटपूटमध्ये सुवर्णपदक पटकावले. नायब सुभेदार सर्वेश यांनी उंच उडीत, नायब सुभेदार गुलवीर यांनी 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत, हवालदार अजय बाबू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये, लेफ्टनंट कर्नल नीरज चाेप्रा यांनी भालाफेकीत, हवालदार जादुमणी यांनी बाॅक्सिंगमध्ये, लान्स नायक शुभम जुयाल यांनी पॅरा शाॅटपूटमध्ये, तर सुभेदार नरेंदर यांनी बाॅक्सिंगमध्ये राैप्यपदकाची कमाई केली. नायब सुभेदार गुलवीर यांनी पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवल्याची माहिती लष्कराने दिली.