देशात १०० कोटी रुपये उत्पन्न असलेले श्रीमंत वाढले

    07-Aug-2026
Total Views |

Income 
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट (वि.प्र.) :
2025-26 या मूल्यांकन वर्षात, 576 लाेकांनी त्यांच्या आयकर विवरणपत्रात 100 काेटी रुपये किंवा त्याहून अधिक एकूण उत्पन्न दाखवले आहे. गेल्या पाच वर्षांत या संख्येत चाैपटीने वाढ झाली आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चाैधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
 
देशात अब्जाधीशांची संख्या लक्षणीय वाढली असून, भारत याबाबतीत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे, याची सरकारला जाणीव आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला हाेता. चाैधरी म्हणाले की, आयकर कायदा, 2025 किंवा जुन्या आयकर कायदा, 1961 मध्ये ‘अब्जाधीश’ या शब्दाची काेणतीही कायदेशीर व्याख्या नाही. तथापि, मूल्यांकन वर्ष 2025-26 मध्ये दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रात (खढठ) 100 काेटी रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न घाेषित करणाऱ्या लाेकांची संख्या 576 हाेती. 2020-21 मध्ये ही संख्या 142 हाेती, म्हणजेच पाच वर्षांत या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे.
 
2022-23 मध्ये 100 काेटी रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न घाेषित करणाऱ्यांची एकूण संख्या 301 हाेती.
जी मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 284 पर्यंत कमी झाली हाेती. तथापि, मूल्यांकन वर्ष 2024-25 मध्ये ही संख्या 415 पर्यंत वाढली हाेती. चाैधरी म्हणाले की, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (झङऋड) अहवालानुसार शहरी आणि ग्रामीण दाेन्ही भागांतील श्रम बाजार काेव्हिड-पूर्व पातळीपेक्षा सुधारले आहेत.