नाशिक, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
कुंभमेळ्यादरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची माेठी वर्दळ राहणार आहे. वेगवेगळ्या पर्वणींच्या काळात 30 लाखांहून अधिक भाविक नाशिक व त्र्यंबकनगरीत दाखल हाेतील. त्यांच्या क्षुधाशांतीसाठी जिल्हा परिसरातील बचत गट सक्रिय झाले असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील दहा हजारांहून अधिक महिलांना राेजगार उपलब्ध हाेईल.
नाशिकच्या रानमेव्यासह येथील खाद्यसंस्कृती बाहेरगावांहून येणारे पर्यटक व भाविकांना अनुभवता येणार आहे.
प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर भव्य स्वरूपात हाेणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात काेणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामांनी वेग घेतला आहे.
दुसरीकडे हा कुंभमेळा अनेकांसाठी राेजगाराची संधी ठरत आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेकांना काम मिळणार असून, जिल्हा परिसरातील 80 हजारांहून अधिक बचत गटांना राेजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद सक्रिय झाली आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, हरसूल आदी भागांतील बचत गटांना एकत्र करून कामांची आखणी केली जात आहे.
बाहेरगावांहून येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, ताजे आणि घरगुती चवीचे अन्नपदार्थ मिळावेत याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने एकल महिला व बचत गटांच्या माध्यमातून ठिकठिकाणी फूडकाेर्ट सुरू करण्यात येणार आहेत. लहान पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फुलक्याच्या आकारातील पाेळ्या, भाकरीचे विविध प्रकार, झुणका, पिठलं, तांदळाच्या विविध पदार्थांसह नाशिकची ओळख असलेली कडधान्यांची मिसळ असे विविध पर्याय दिले जाणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले.