कुविद्येच्या लक्षणांची जंत्री वाचताना आणि ऐकताना श्राेत्यांच्या मनात सहजच त्या दाेषांसंबंधी तिटकारा निर्माण हाेईल, अशीच शब्दरचना श्रीसमर्थांनी केलेली आहे. कठाेर व्यंजनांच्या उच्चाराघाताने आणि प्रत्याघाताने मनामध्ये तीव्र तरंग निर्माण हाेतात, असे मानसशास्त्र सांगते. या संपूर्ण समासात श्रीसमर्थांनी केलेला र, ड, ढ, ट, त, थ, श, ष, द्र, अशा अक्षरांचा मुक्त वापर त्यांच्यातील मानसशास्त्रीय ज्ञानाचाही प्रत्यय देणारा म्हणावा लागेल. ते म्हणतात कुविद्येने चालणारा माणूस कपटी, तामसी, अविचारी, पापी, पैशाच्च वृत्ती असणारा, तापट स्वभावाचा असताे.
स्वत:च्या स्वार्थापायी ताे स्त्रीहत्या, गाेहत्या, मातृहत्या, पितृहत्या करण्यासही मागेपुढे न पाहणारा पातकी असताे आणि एका तऱ्हेने अशा वर्तणुकीमुळे ताे स्वत:चीच हत्या करीत असताे.
संशयी, भांडकुदळ, अधर्मी, चांगली लाेकरहाटी माेडणारा, चहाडखाेर, व्यसनी, खाेडाळ, नाठाळ, अपयशी, ओंगळपणे राहणारा, अतिचिक्कू, लाेकांना कुमार्गाला लावणारा, स्वार्थी, लंपट, शिरजाेर, अदावत किंवा आळ आणि संशय विनाकारण घेणारा ही सर्व कुविद्येचीच लक्षणे आहेत. लाेकांना ठकविणारा, मठ्ठ बुद्धीचा, भित्रा रणछाेडदास, बेमुर्वतखाेर, उन्मत्त, लफंगा, चाेरटा आणि अपहार करणारा हाही असुर प्रवृत्तीचा समजावा. आजकाल अपहार हा शब्द आपल्याला काेटीकाेटींच्या घाेटाळ्यामुळे अगदी चांगला माहीत झालेला आहे.