आताच जागृत व्हा; अन्यथा अँटिबायोटिक्स औषधे निष्प्रभ ठरतील

    06-Aug-2026
Total Views |
 
medicines
जग पुन्हा अशा काळात जात आहे, जिथे अँटिबायाेटिक्स अस्तित्वातच नव्हती आणि एका सामान्य संसर्गामुळे किंवा लहानशा दुखापतीमुळे लाेक मृत्युमुखी पडत हाेते.
अँटिबायाेटिक्स ही अशी औषधे आहेत ज्याद्वारे लाेक दीर्घकाळ निराेगी आयुष्य जगण्यास सक्षम झाले हाेते. तथापि, जग पुन्हा अशा दिशेने वाटचाल करत आहे, जिथे ही औषधे काम करणार नाहीत आणि त्यामुळे जाे विनाश ओढवेल त्याची कल्पना करणेही कठीण आहे.
 
अँटिबायाेटिक्स औषधांमध्ये काळानुसार बदल हाेत राहतात. कारण अधिकाधिक स्ट्राँग बॅक्टेरियांच्या प्रजाती समाेर येत असतात आणि त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला सतत प्रभावी औषधांची गरज भासते. मात्र, एक काळ असा येईल की जेव्हा औषधांच्या मर्यादा संपतील आणि बॅक्टेरियांवर काेणत्याही प्रकारची औषधे काम करणार नाहीत.
 
कारण औषधे मर्यादित आहेत. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. मानव जातीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण हाेऊ शकेल इतकी गंभीर ही परिस्थिती आहे, जिला ‘अँटिबायाेटिक्स रेझिस्टन्स’ असे म्हणतात.
 
आपल्या काही सवयी या प्रक्रियेला बळ देतात. आपण आपल्याच चुकांचे बळी ठरणार आहाेत. सर्वप्रथम या चुका समजून घेण्यासाठी स्वतःला हे प्रश्न विचारा.
 
सामान्य सर्दी झाली किंवा थाेडा ताप आला, घसा दुखत असेल तर तुम्ही जुने प्रिस्क्रिप्शन शाेधता का? त्या वेळी अँटिबायाेटिक्स घेतली हाेती, तर या वेळीही अँटिबायाेटिक्स घ्यावीच लागेल, असे गृहीत धरून तुम्ही डाॅक्टरांना न विचारता स्वतःहून औषधे सुरू करता का? काेणतीही समस्या उद्भवली तर डाॅक्टरांकडे न जाता मेडिकल स्टाेअरमध्ये जे औषध मिळेल ते तुम्ही घेता का? डाॅक्टरांनी तुम्हाला पाच दिवसांची औषधे दिली असतील; पण तिसऱ्या दिवशी बरे वाटू लागल्यामुळे उरलेली दाेन दिवसांची औषधे तुम्ही घेत नाही का? काहीही करून मला दाेन दिवसांत बरे करा, तुम्ही मला हाय- पाॅवरची औषधे द्या, अशी विनवणी तुम्ही डाॅक्टरांना करता का? या प्रश्नांची उत्तरे हाे असतील, तर याचा अर्थ असा की निर्माण झालेल्या या बिकट परिस्थितीत तुमचा वाटा आहे. जेव्हा या प्रकारचा निष्काळजीपणा हाेताे, तेव्हा व्य्नती केवळ स्वतःलाच नाही, तर संपूर्ण समुदायाला अडचणीत आणते. स्वतःसाठी नाही, तर मानव जातीसाठी विचार करा. या चुका करू नका.
प्रत्येक कारण आपल्याला अँटिबायाेटिक्स रेझिस्टन्सच्या दिशेने ढकलत आहे.