गडचिराेली, 30 ऑगस्ट (आ.प्र.) :
गडचिराेली जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत काेणतीही तडजाेड खपवून घेतली जाणार नाही. निकृष्ट अथवा सदाेष कामांची चाैकशी करून दाेषींवर कठाेर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेंसले यांनी येथे दिला.
जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती व पुनर्बांधणीचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गडचिराेली जिल्ह्यातील पुलांचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज देण्याची मागणी गडचिराेलीचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी केली. त्याची दखल घेत काेकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील आवश्यक लहान-माेठ्या पुलांचा सर्वंकष प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र विशेष निधी पॅकेजची मागणी करण्यात येईल, असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.
शिवेंद्रसिंहराजे यांनी गडचिराेली जिल्ह्याच्या दाैऱ्यादरम्यान अडपल्ली येथील गाेंडवाना विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी परिसराला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनात गाेंडवाना विद्यापीठाची विकासकामे, काॅरिडाॅर; तसेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अंतर्गत प्रस्तावित व सुरू असलेल्या विविध रस्ते व पुलाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
मायनिंग काॅरिडाॅर अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे 491.91 काेटींच्या विविध रस्ते व पुलांच्या कामांची प्रगती यावेळी तपासण्यात आली. जिल्ह्यातील औद्याेगिक विकासाला येत असलेली गती आणि वाढती खनिज वाहतूक लक्षात घेता मायनिंग काॅरिडाॅरमधील रस्त्यांची क्षमता, रुंदी व गुणवत्ता भविष्यातील वाहतुकीच्या गरजांनुसार असावी. अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान हाेणार नाही, यासाठी बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकषांचे काटेकाेर पालन करावे, असे निर्देश शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.