'कोयना'चे सहा दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    03-Aug-2026
Total Views |

koyna 
काेयनानगर, 2 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
राज्याची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले.
वक्र दरवाज्यांतून 5079 क्युसेक पाणी काेयना नदीपात्रात साेडण्यात येत आहे; तसेच काेयना पायथा वीजगृहाच्या एका जनित्रातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, एकूण 6129 क्युसेक विसर्ग काेयना नदीत सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
यंदा जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने काेयना धरणातील पाणीसाठा आणि खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण हाेते. मात्र, जुलैत पावसाने दमदार पुनरागमन केल्याने धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उघडण्याची वेळ आली. सध्या काेयना धरणात 84.77 टीएमसी पाणीसाठा असून, धरणात 25293 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जाेर कायम राहिल्यास विसर्गात वाढ हाेण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.