मुंबई, 28 ऑगस्ट (आ.प्र.) :
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ट्रॅकमनना रुळांवरील गस्त प्रभावीपणे हाेत आहे का, याची खातरजमा करण्यासाठी जीपीएस यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. आता पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी जीपीएस-आधारित स्मार्ट जॅकेटची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. याद्वारे तिकीट तपासनीस (टीसी) नेमके कुठे कार्यरत आहेत, याची माहिती घेतली जाईल.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्मार्ट जॅकेटमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्तव्यावरील टीसीचे प्रत्यक्ष स्थळ (रिअल टाइम लाेकेशन) समजणार असून, तिकीट तपासणी पथकांचे नियाेजन व आपत्कालीन स्थितीत सुरक्षा यंत्रणेला तातडीने मदत करणे अधिक साेपे हाेणार आहे. मुंबई विभागात सुमारे 1064 तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची कर्तव्याची स्थानके, भरारी पथकातील कर्मचाऱ्यांची लाेकल व मेलएक्स्प्रेस गाड्यांमध्ये; तसेच विशेष तपासणी माेहिमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असते. त्यामुळे काेणते पथक नेमके कुठे कार्यरत आहे व गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ कुठून पाठवता येईल, यासाठी जीपीएसची मदत हाेणार आहे. त्यामुळे भरारी पथकांचे नियाेजन अधिक प्रभावी हाेण्याची अपेक्षा आहे. तसेच तिकीट तपासणीदरम्यान प्रवाशांशी वाद, धक्काबुक्की वा अन्य अनुचित घटना घडल्यास संबंधित टीसीचे नेमके ठिकाण त्वरित समजू शकणार आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा पथकाला घटनास्थळी लवकर पाेहाेचणे शक्य हाेईल.
नमस्ते अभियान या संकल्पनेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रवाशांशी नम्र, व्यावसायिक व जबाबदारीने संवाद साधण्यावर त्यात भर देण्यात आला आहे. तसेच विशेष घटना ध्वनिचित्रित केल्या जाणार आहे. जीपीएस व कॅमेऱ्यासाेबत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वरूपाचे काेटही तयार करण्यात येत आहेत.