सत्त्वगुण अंगी बाणल्यानंतर त्या व्यक्तीचे विचार, आचार आणि उच्चार या तिन्हींमध्येही गुणात्मक बदल हाेताे.
त्याला पाहिले तरी त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा विलक्षण प्रसन्नता, शांतता व समाधान विलसताना दिसते. आंतरिक सुधारणेचे ते तेज आपाेआपच जनसामान्यांनासुद्धा जाणवते. त्याची वर्तणूक कशी आदर्श असते ते सांगताना श्रीसमर्थ म्हणतात की, काेणी विनाकारण अन्याय केला, त्रास दिला तरी त्याची क्षमाशील वृत्ती ढळत नाही. एखाद्या समुद्राप्रमाणे त्याचे अंत:करण विशाल असते आणि त्यात ताे असे अनंत अपराध दयाबुद्धीने गिळताे. मनाेविकारांवर त्याचा पूर्ण ताबा असताे आणि इंद्रियांवर ताे सत्ता गाजविताे. असत्य साेडून ताे सत्यमार्गानेच चालताे आणि भक्तीभाव वृद्धिंगत करताे.
केवळ आपण उद्धरून जाऊन पुरे हाेत नाही तर आपल्या सभाेवतालच्या सर्वांना सन्मार्ग दाखविणे हे कार्यही ताे करीत असताे. चांगल्या ग्रंथांचा संग्रह, त्यांचे वाचन व प्रवचन यामध्ये त्याला रस असताे, स्वच्छ व नीटनीटके रहाणे, पवित्र वागणे आणि सदैव चांगलेच बाेलणे ही त्याची वैशिष्ट्ये असतात.श्रीसमर्थांचे समाजजीवनात किती बारीक लक्ष असे याचा दाखला या सत्त्वगुण समासातही मिळताे. 74 व्या ओवीत ते म्हणतात.
विदेसी मेले मरणें । तयास संस्कार देणे । अथवा सादर हाेणे । ताे सत्त्वगुण ।।