दुर्गम भागात औषधे पोहोचवण्यासाठी आदिवासी मुली 'ड्रोन दीदी' बनणार

    29-Aug-2026
Total Views |
 
nashik
मुंबई, 28 ऑगस्ट (आ.प्र.) :
नाशिक जिल्ह्यातील दुर्गम डाेंगराळ भागातील आदिवासींना औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य पाेहाेचवण्यासाठी ड्राेनचा वापर केला जाणार आहे. यासाठी आयआयटी मुंबईच्या मदतीने स्थानिक मुलींना ‘ड्राेन दीदी’ म्हणून प्रशिक्षित केले जाईल.
 
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी, हिंदाेरी आणि कळवण तालुक्यांमधील काही आदिवासी भाग डाेंगराळ आणि दुर्गम आहेत, त्यामुळे तेथील लाेकांना पावसाळ्यात माेठ्या अडचणींचा सामना करावा लागताे. नद्या आणि ओढ्यांना पूर येणे, पाण्याची पातळी वाढणे आणि काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे अनेक गावे आणि वस्त्यांशी संपर्क तुटताे.
 
अशा परिस्थितीत, रुग्णांना रुग्णालयात नेणे आणि दुर्गम भागांमध्ये आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य पाेहाेचवणे हे प्रशासनासाठी एक माेठे आव्हान बनते.
ही समस्या साेडवण्यासाठी, नाशिक जिल्हा प्रशासनाने ड्राेनच्या माध्यमातून दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
 
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने, आराेग्य विभागाने या उपक्रमासाठी आयआयटी मुंबई तज्ज्ञांची मदत घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या ड्राेनमध्ये 2 ते 10 किलाेपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे, आपत्कालीन परिस्थितीत डाेंगराळ भागांमध्ये कमी वेळेत आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य पाेहाेचवणे शक्य हाेईल.
मुसळधार पावसामुळे रस्ते किंवा पूल बंद असताना हे तंत्रज्ञान प्रभावी ठरू शकते. या उपक्रमात स्थानिक महिलांनाही सहभागी करून घेतले जात असून, त्यांना ‘ड्राेन दीदी’ म्हणून ड्राेन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सुरगाना भागातील आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह काही महिलांना आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.