मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मुंबईत राेज माेठ्या प्रमाणावर निर्माण हाेणाऱ्या राडाराेड्याचे व्यवस्थापन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाटीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेने मुंबई डेब्रिज कंट्राेल अँड ट्रॅकिंग सिस्टीम (एमडीसीटीएस) सुरू केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. बांधकाम व्यावसायिक, विकासक, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, पायाभूत सुविधा प्राधिकरणे, महापालिकेचे कंत्राटदार, व्यावसायिक आस्थापना, वाहतूकदार, उत्खनन करणाऱ्या संस्था, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, वास्तुविशारद, अधिकृत मालक, स्टाेन क्रशर चालक, बांधकाम किंवा दुरुस्तीची कामे करणाऱ्यांना या संकेतस्थळावर नाेंदणी करणे आवश्यक आहे.
मुंबईतील बांधकाम, पुनर्विकास, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि उत्खननाच्या कामांमधून माेठ्या प्रमाणात राडाराेडा निर्माण हाेते. रस्त्यांच्या कडेला, माेकळ्या जागांवर, खाडी, जलाशय परिसरात अनधिकृतपणे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी, धूळ प्रदूषण आणि नागरिकांची गैरसाेय हाेते. याला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकाम व पाडकाम राडाराेडा व्यवस्थापन नियम-2025 नुसार ही प्रणाली विकसित केली आहे. एमडीसीटीएस प्रणालीमुळे बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता, उत्तरदायित्व व पर्यावरणविषयक नियमांचे पालन अधिक प्रभावी हाेणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), म्हाडा, झाेपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई बंदर प्राधिकरण आदी प्राधिकरण व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्पांशी संबंधित संस्था व कंत्राटदारांनी मंजूर कार्यपद्धतीचे पालन करण्याचे निर्दे श द्यावेत, अशी सूचना महापालिका आयु्नत अश्विनी भिडे यांनी केली; तसेच क्रेडाई, नरेडकाे आणि पीईएटीए या संघटनांनाही त्यांच्या सदस्यांपर्यंत मंजूर कार्यपद्धती पाेहाेचवणे तसेच विकासक, वास्तुविशारद, प्रकल्प सल्लागार, उत्खनन संस्था व वाहतूकदारांनी संकेतस्थळावर नाेंदणी करून आवश्यक परवानग्या घेणे व राडाराेड्याची वाहतूक केवळ एमडीसीटीएस प्रणालीद्वारे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.