मुंबई, 28 ऑगस्ट (आ.प्र.) :
विज्ञान, अवकाश आणि मनाेरंजनाचा त्रिवेणी संगम घडवणाऱ्या ‘स्पेसफेस्ट’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्याेग विभागाच्या वतीने लवकरच आयाेजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याला अवकाश क्षेत्रातील उद्याेगांचे जागतिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याची घाेषणा उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी केली.
नव्या पिढीतील मनाेरंजन, गेमिंग आणि ई-स्पाेर्ट्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची नाेडविन गेमिंग कंपनी आणि राज्य सरकारच्या विद्यमाने हा तीन दिवसीय स्पेसफेस्ट देशातील अंतराळ, विज्ञान, नवकल्पना आणि अंतराळावर आधारित पाॅप कल्चरला समर्पित कार्यक्रम असेल, असे सामंत यांनी सांगितले. यावेळी उद्याेग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रायमस पार्टनर्स इंडियाच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आरती हरभजनका आणि नाेडविन गेमिंगचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी उपस्थित हाेते.
स्पेसफेस्ट हा केवळ मनाेरंजनाचा कार्यक्रम नसून राज्यातील विद्यार्थी, तरुण आणि नवउद्याेजकांना अवकाश क्षेत्रातील नव्या संधींची ओळख करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून भविष्यातील राेजगार आणि उद्याेगांच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
चांद्रयान माेहिमेच्या माध्यमातून राज्यातील अनेक लघु व मध्यम उद्याेगांनी महत्त्वपूर्ण याेगदान दिले आहे.
विशेषतः पुणे जिल्ह्यातील अनेक उद्याेगांनी चांद्रयानासाठी आवश्यक भाग तयार केले हाेते. अवकाश क्षेत्राशी संबंधित या विविध उद्याेगांना एका छत्राखाली आणून राज्याची क्षमता जगासमाेर मांडण्याचा प्रयत्न स्पेसफेस्टच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.