रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी प्रशिक्षणाचा उपक्रम सुरूच राहणार : सरनाईक

अफवांवर विश्वास न ठेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन

    28-Aug-2026
Total Views |
 
pratapsarnaik
मुंबई, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
राज्यात रिक्षा व टॅक्सी चालवणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या उद्देशाने परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या 105 दिवसांच्या विशेष उपक्रमांद्वारे राज्यातील सुमारे 1 लाख 65 हजार 800 रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे दिली.
 
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीचे प्रशिक्षण उपक्रमाला चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. राज्याची अस्मिता आणि संस्कृतीचा आदर राखण्याची भूमिका सरनाईक यांनी मांडली. ज्या चालकांना अद्याप मराठीचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी काेकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासाेपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची यादी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रांची माहिती मिळण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगून सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून काेणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई हाेणार नाही, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली.