मुंबई, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
इंजिनिअरिंगचे शिक्षण केवळ वर्गापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना उद्याेगविश्वातील प्रत्यक्ष अनुभव, व्यावहारिक काैशल्ये, राेजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने अप्रेंटिसशीप एम्बेडेड बी.ई. पदवी अभ्यासक्रमम (एईडीपी) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवीसाेबतच उद्याेगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत हा अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची राेजगारक्षमता वाढण्यास, उद्याेगाच्या गरजांनुसार काैशल्ये विकसित हाेण्यास आणि पदवी पूर्ण करतानाच व्यावसायिक जगतात आत्मविश्वासाने प्रवेश करण्यास माेठी मदत हाेणार आहे.
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात शिकवले जाणारे ज्ञान विद्यार्थी प्रत्यक्ष उद्याेगांतील प्रकल्प, प्रक्रिया आणि कामकाजात वापरू शकणार आहेत. त्यामुळे सैद्धांतिक शिक्षण आणि प्रत्यक्ष कामातील दरी कमी हाेणार आहे.
अप्रेंटिसशीप एम्बेडेड बी. ई. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या सैद्धांतिक ज्ञानासाेबत उद्याेगातील प्रत्यक्ष कामकाज, आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक काैशल्यांचा अनुभव मिळणार आहे, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. एईडीपी अंतर्गत बी.ई.च्या अंतिम वर्षातील जास्तीत जास्त 15 टक्के विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात सहभागी हाेता येईल. पाचव्या सत्रात किमान 6.75 सीजीपीए असणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेद्वारे केली जाईल. अधिक सीजीपीए असलेल्यांना प्राधान्य मिळेल. मात्र, ऑनर्स, मायनर किंवा ऑनर्स विथ रिसर्च निवडलेल्यांना या याेजनेत सहभागी हाेता येणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.