कास पठारावर यंदा पर्यटकांना पर्यावरणपूरक सुविधा !

दोनशे रुपयांच्या शुल्कात मिळणार पार्किंग व बसची सेवा

    28-Aug-2026
Total Views |

kaspathar 
सातारा, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
जागतिक वारसास्थळ व विविधरंगी दुर्मीळ फुलांसाठी पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर येत्या हंगामात पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी व फुलांच्या संरक्षणासाठी कास पठार समिती व वन विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रवेश शुल्क 200 रुपये आकारले जाणार आहे. त्यात पार्किंग फ्री, पार्किंग ते कास पठार बस फ्री व कास पठार फुलांची माहिती पुस्तिका देण्यात येणार आहे.
 
कास पुष्प पठाराचा रंगीबेरंगी फुलांचा हंगाम 1 सप्टेंबरपासून सुरू हाेणार असल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आता कासचे वेध लागले आहेत. गेल्या वर्षी सव्वा लाखांच्या आसपास पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली हाेती. पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन यंदा वन विभाग व कास पठार समितीने विशेष पावले उचलली असून, विविध अत्याधुनिक साेयी-सुविधांमुळे पर्यटकांचा निसर्गरम्य प्रवास अधिक आनंददायी आणि साेयीस्कर हाेणार आहे.
 
येत्या हंगामात पर्यटकांना दुर्मीळ फुलांचा मनमुराद आनंद लुटत असताना काेणत्याही अडचणी निर्माण हाेऊ नयेत, तसेच पठारावरील विविधरंगी फुलांचे संरक्षण व्हावे, यासाठी विविध साेयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. पर्यटन विकास निधीतून विविध विकासकामे आणि उपाययाेजना वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. उपवनसंरक्षक अमाेल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप राैंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संताेष पाटील, संदीप जाेपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कास पठार समिती व वन विभागाने विविध कामांची तयारी पूर्ण केली आहे.