कडा (जि. बीड), 26 ऑगस्ट (आ.प्र.) :
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील तीन वर्षीय नर वाघाने अन्न व नवीन क्षेत्राच्या शाेधात 550 किमीचा प्रदीर्घ प्रवास करून बीड जिल्ह्यात सध्या आश्रय घेतला आहे.
हा वाघ आष्टी वनपरिक्षेत्रातील देवळालीवेलतुरीच्या जंगलात सुरक्षितपणे स्थायिक झाल्याची माहिती वन विभागाने दिली.
वाघाची ही अविश्वसनीय भ्रमंती वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे.
टिपेश्वर अभयारण्यात टी-22 या वाघिणीच्या पाेटी 2022 मध्ये या वाघाचा जन्म झाला हाेता. नवीन अधिवासाच्या शाेधात ताे डिसेंबर 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील येडशीच्या रामलिंग अभयारण्यात आला. त्यानंतर वाघाने बार्शी, धाराशिव, साेलापूर, लातूर आणि अहिल्यानगरमधील कर्जत परिसरात भ्रमंती केली. फेब्रुवारीत कर्जतमध्ये त्याला पाहिले गेले. पाच महिन्यांच्या अदृश्यतेनंतर 3 ऑगस्टला आष्टी तालुक्यातील देवळाली-वेलतुरीच्या जंगलात त्याच्या खुणा आढळल्या. देवळाली पानाची येथे एका जनावराचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाच्या लक्ष्यावर असलेल्या या वाघाने 13 ऑगस्टला ब्रह्मगाव येथेही हल्ला केला. तत्पूर्वी त्या परिसरातील हालचालींची नाेंद घेण्यासाठी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवले हाेते. अखेर 20 ऑगस्टला हा वाघ कॅमेऱ्यात कैद झाला. हा वाघ 550 किमी अंतर कापून बीड जिल्ह्यातील आष्टीत आला आहे. धाराशिव, साेलापूर, लातूर, अहिल्यानगर आणि बीड या पाच जिल्ह्यांत भटकंती करताना ताे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या शाेधात आहे.