अमरावती, 26 ऑगस्ट (आ.प्र.) :
येथील जिल्हा महिला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेच्या चाैकशीसाठी सात सदस्यीय चाैकशी समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे.
यात दाेषी आढळणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येईल, काेणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली.
जिल्हा महिला रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आबिटकर यांनी दुर्घटना घडलेल्या एनआयसीयूला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुलभा खाेडके, महापाैर चंद तेजवानी, आराेग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. निपुण विनायक, विभागीय आयु्नत नयना गुंडे, आराेग्य विभागाचे संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित हाेते.
या घटनेचे नेमके कारण शाेधून यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाययाेजना सूचवण्यासाठी आराेग्य विभागाचे आयु्नत संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, एम्सचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशाेधन संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आठ दिवसांत घटनेचा सखाेल तपास करून प्रत्यक्ष जबाबदार असलेल्यांवर कठाेर कारवाई करण्यात येईल, असे आबिटकर यांनी सांगितले.
ही समिती समस्येच्या खाेलात जाऊन कारणे शाेधणार आहे. व्हेंटिलेटर, वीजयंत्रणेतील दाेष, फायर ऑडिट; तसेच अन्य अनियमिततेची सखाेल तपासणी करेल. यंत्रणेत ज्या त्रुटी आढळून येतील त्या दुरुस्त करण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करेल. तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना राज्य शासनातर्फे पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवरील उपचारांचा खर्च शासनाकडून करण्यात येईल, असेही आबिटकर यांनी सांगितले. दरम्यान, आबिटकर यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या दुर्घटनेतील नवजात बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली.