ठाणे, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
काेट्यवधींचे गृहप्रकल्प उभारणाऱ्या विकासकांकडून रस्त्यावर चिखल, माती आणि धुळीचे प्रदूषण हाेत असल्याची तक्रार करण्यात येत हाेती. या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने काेलशेत परिसरातील बड्या विकासकांवर कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांना नाेटिसा बजावत त्यांच्यावर 50 हजारांची दंडात्मक कारवाई केली; तसेच नियम माेडल्यास काम बंद करण्याचा इशाराही दिला. अशी कारवाई नियमितपणे सुरू असल्याचे महापालिकेच्या प्रभारी पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी सांगितले.
ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी पुराव्यांसह केलेल्या तक्रारींनंतर महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने संबंधित बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. या पाहणीत बांधकाम स्थळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर चिखल व माती पसरणे, वाहनांसाठी चाके धुण्याची व्यवस्था नसणे व रस्त्यावरच वाहने धुणे यासारखे प्रकार आढळले. त्यानंतर महापालिकेने विकासकांवर कारवाई केली. एंड्रेस हाउझर इंडिया प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यावर माेठ्या प्रमाणात चिखल पसरल्याचे आढळल्याने 50 हजारांचा दंड करण्यात आला. लाेढा डेव्हलपर्सकडे वाहनांची चाके धुण्याची व्यवस्था नसल्याने व रस्त्यावर चिखल पसरल्याने 50 हजारांचा दंड ठाेठावून सात दिवसांत खुलासा करण्याची नाेटीस देण्यात आली. खुलासा समाधानकारक न मिळाल्यास काम बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.
जेएसपीएल मशिन बिल्डर्सकडेही वाहनांची चाके धुण्याची व्यवस्था नसल्याचे आढळून आल्याने या कंपनीसही 50 हजारांचा दंड ठाेठावण्यात आला. महापालिकेने संबंधितांना केवळ दंड करून साेडलेले नाही. तीन दिवसांत दंडाची र्नकम न भरल्यास किंवा प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन केले न केल्यास परवाना रद्द करण्यासह फाैजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.