श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासांत दु:खदायक आणि दारूण असा तमाेगुण सांगितल्यावर आता या समासात परम दुर्लभ अशा सत्त्वगुणांची महती ऐकावी.
सत्त्वगुणाचाच सन्मार्ग, याेगसाधना, संसारमुक्ती आणि भवराेगापासून सुटका याला आधार असताे. त्यामुळेच भगवंताची साधना सुरू हाेते व मुक्तीचा मार्ग साधताे. भक्त आणि भक्ती, भवसागर तरून जाण्याची शक्ती आणि साधकाचे अंतिम ध्येय सायाेज्यमुक्ती या सर्व गाेष्टी सत्त्वगुणानेच साध्य हाेऊ शकतात. केवळ रजाेगुणीच नव्हे तर अगदी तमाेगुणी माणसेसुद्धा दृढ निश्चय, विवेकाचा आधार आणि परमेश्वरी कृपा यांच्या जाेरावर आपल्या अंगातील दुर्गुण पालटवू शकतात; सद्गुणी हाेऊन अंतत: सत्त्वगुणी बनू शकतात. किंबहुना सर्वांनी त्या मार्गाने सत्त्वगुणी व्हावे हाच श्रीसमर्थांचा या उपदेशामागील प्रधान हेतू आहे.
ते म्हणतात की, सत्त्वगुण परमार्थाची शाेभा, महंतांचे आणि याेग्यांचे भूषण आहे आणि त्याच्या येण्याने रज आणि तम यांचे आपाेआप निरसन हाेते. ताे परमसुख देणारा असून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून देऊन माणसांना निरंतरचा आनंद देत असताे. त्यामुळे भ्रांतिमूलक अज्ञानाचा शेवट हाेताे आणि पुण्यशरीर बनून माेक्षसाधनेचा रस्ता साधकाला सुलभ व सहजसाेपा बनून जाताे. तस्मात् सर्वांनी आपल्या अंतरी असणारे रज आणि तम यांचा नाश करून सत्त्वगुणी हाेण्याचा प्रयत्न करण्यातच हित साठवलेले आहे!
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299