मनुष्यबळ व्यवस्थापन गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास : देशातील पहिले ई-ऑर्डर मॉड्यूल सुरू

    26-Aug-2026
Total Views |
 
MAH
मुंबई, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
देशात मनुष्यबळ व्यवस्थापनात राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. त्याचेच उदाहरण ही महा ई-एचआरएमएस प्रणाली आहे. ही प्रणाली गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.
 
तसेच महाराष्ट्राने डिजिटल सामर्थ्याची आणखी एक यशाेगाथा देशासमाेर ठेवल्याचे गाैरवाेद्गारही त्यांनी काढले.
राज्य शासनाच्या महा ई-एचआरएमएस, महाआयएएस आणि मेंटाॅर मेंटी पाेर्टल या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात आयाेजित कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला.
 
यावेळी ‘जिज्ञासा’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहायकासह देशातील पहिले स्वयंचलित माॅड्यूलही सुरू करण्यात आले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यासह भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
देशात 1935 पासून प्रचलित असलेल्या भाैतिक सेवापुस्तकांऐवजी आता महा ईएचआरएमएसमुळे संरचित डिजिटल ई-सेवा पुस्तक उपलब्ध हाेणार आहे. ई- ऑर्डर माॅड्यूलमधून हाेणाऱ्या प्रत्येक आदेशाच्या आधारे संबंधित सेवाविषयक नाेंदी स्वयंचलितपणे अद्ययावत हाेतील. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना एसएमएस अथवा ई-मेलद्वारे सूचना मिळतील. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण सेवाकालातील आदेशांनुसार डिजिटल सेवापुस्तक सातत्याने अद्ययावत राहील.