मुंबई, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
रेल्वेने मालवाहतुकीत महत्त्वाचा टप्पा गाठत जवाहरलाल नेहरू पाेर्ट (जेएनपीटी) येथून गुजरातेतील बडाेदा विभागातील वर्णमा येथील काॅनकाॅरच्या जीसीटी टर्मिनलकडे पहिली डबल-स्टॅक लाँग-हाॅल कंटेनर ट्रेन नुकतीच यशस्वीपणे चालवली. या ट्रेनने एकाच फेरीत 360 टीईयू कंटेनर्सची वाहतूक करत सुमारे 422 किमी अंतर पार केले.
या लाँग-हाॅल रचनेत प्रत्येकी 451 वॅगन्स असलेल्या दाेन डबल-स्टॅक रेक्सचा समावेश हाेता. पुढील रेकचे वजन 1817 टन असून, त्यासाठी लाेकाे क्रमांक 60311 वापरण्यात आले, तर मागील रेकचे वजन 2105 टन असून, त्यासाठी लाेकाे क्रमांक 24690 जाेडण्यात आले हाेते. या प्रयाेगामुळे एकाच ट्रेनमध्ये माेठ्या प्रमाणात कंटेनर्स वाहून नेण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. त्यामुळे बंदरे आणि मालवाहतूक टर्मिनल्सवरील गर्दी कमी हाेण्यास, कंटेनर्सचा मु्नकाम कालावधी घटण्यास आणि मालाची जलद ने-आण हाेण्यास मदत हाेणार आहे. एकाच फेरीत अधिक कंटेनर्स वाहून नेल्यामुळे लाेकाेमाेटिव्ह आणि कंटेनर फ्लॅट वॅगन्सची गरज कमी हाेईल; तसेच तितकाच माल वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या ट्रेन फेऱ्यांची संख्याही कमी हाेईल. परिणामी, रेल्वे मार्गाच्या उपलब्ध क्षमतेचा अधिक कार्यक्षम वापर हाेऊन मालवाहतुकीचा एकूण वेळ आणि खर्च कमी हाेण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
ही सेवा पर्यावरणपूरक मालवाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. ही गाडी पूर्णपणे विजेवर चालत असल्याने रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी हाेईल. एका डबल-स्टॅक लाँग-हाॅल गाडीद्वारे माेठ्या संख्येने ट्रकच्या बराेबरीचा माल वाहून नेता येत असल्याने डिझेलचा वापर, वाहतूक काेंडी, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत हाेणार आहे.