नवी दिल्ली, 25 ऑगस्ट (वि.प्र.) :
भारतातील आधुनिक इलेक्ट्रिक दुचाकी क्रांतीला बराेबर दहा वर्षे पूर्ण हाेत असताना एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. जून 2026 मध्ये दुचाकी बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा प्रथमच 10% च्या पुढे गेला आहे.
ओला, एथर, राॅयल एनफिल्ड, बजाज आणि टीव्हीएस यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या नवीन उपक्रमांमुळे ई-बाईक बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र झाली आहे. वाहन पाेर्टलच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात एकूण 15.60 लाख दुचाकींची नाेंदणी झाली. यापैकी केवळ इलेक्ट्रिक दुचाकींचा वाटा 1,62,321 (10.36%) हाेता. गेल्या वर्षी याच महिन्यात हा वाटा केवळ 7.28% हाेता. ताे आता वाढून 10.36% झाला आहे.
यापूर्वीच्या महिन्यात, मे 2026 मध्ये हा आकडा 9.18% हाेता. तथापि नीती आयाेगाने 2022 मध्ये असा अंदाज वर्तवला हाेता की, 2027 या आर्थिक वर्षापर्यंत देशातील 100% दुचाकी इलेक्ट्रिक असतील. त्यांनी असेही म्हटले हाेते की, 2024 पर्यंत सरकारी अनुदान काढून टाकले तरीही 2031 पर्यंत हा आकडा 72% पर्यंत पाेहाेचेल. मॅकिन्से या सल्लागार संस्थेचा अंदाज आहे की, भारतातील इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठ आणखी वेगाने वाढेल आणि 2030 पर्यंत 50% पर्यंत पाेहाेचेल
.
प्रमुख कंपन्या आता इलेक्ट्रिक माेटरसायकल बाजारात माेठी गुंतवणूक करत असल्याने बाजाराची सध्याची समीकरणे बदलणार आहेत. ओला इलेक्ट्रिकने आपल्या ई-बाईक्स परवडणाऱ्या आणि किफायतशीर किमतीत सादर केल्या आहेत. राॅयल एनफिल्ड येत्या काही आठवड्यांत आपली पहिली इलेक्ट्रिक माेटरसायकल लाॅन्च करणार आहे. एथर एनर्जीनेही आपल्या ई-बाईक्सची अधिकृत घाेषणा केली आहे. बजाज आणि टीव्हीएसही फार मागे नाहीत. दाेन्ही कंपन्या वेगाने आपल्या स्वतःच्या इलेक्ट्रिक माेटरसायकल्स विकसित करत आहेत. अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून या क्षेत्रात सलग तेजी दिसत आहे.