जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

अहिल्यानगरसह मराठवाड्यातील १.३१ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार

    22-Aug-2026
Total Views |
 
dam
मुंबई, 21 ऑगस्ट (आ.प्र.) :
जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 च्या कामासाठी 6477 काेटी 88 लाखांची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे गाेदावरी खाेऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख 31 हजार 652 हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
 
जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 ही पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. यामुळे 454 दलघमी साठवण क्षमतेचे माजलगाव धरण अस्तित्वात येणार आहे. यावर माजलगाव (लाेणी सावंगी) उपसा याेजना, साळिंबा ठिबक उपसा याेजना, शिरस मार्ग निम्नपात्री बंधारा, राेशनपुरी उच्चपातळी बंधारा व 148 किमीचा माजलगाव उजवा कालवा व त्यावरील गल्हाटी, धाेंड, उकडगाव, मुरंबी, पेंडू, सुभाषनगर हे 6 मार्गस्थ जलाशय व माजलगाव मासाेळी प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम समाविष्ट आहे.
 
जायकवाडी प्रकल्पाच्या कामाचे दाेन टप्प्यांत नियाेजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील जायकवाडी धरण, जायकवाडी प्रकल्पाचा 208 किमीचा पैठण डावा कालवा, त्यावरील शाखा कालवे, वितरिका, उप व लघुवितरिका या घटकांचे काम पूर्ण झाले असून, टप्पा दाेन मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या टप्पा 2 ला 6477.88 काेटींची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यात पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण आणि माजलगाव उजवा कालव्याशी संबंधित कामे हाेणार आहेत. ही कामे झाल्यानंतर अहिल्यानगर व मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील एकूण 1 लाख 31 हजार 652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.