राज्यात सप्टेंबरपासून महसूल लोक अदालत अभियान

बावनकुळे यांची माहिती : जिल्हास्थानावरील महसुली दावे काढणार निकाली

    21-Aug-2026
Total Views |
 
Bawankule
मुंबई, 20 ऑगस्ट (आ.प्र.) :
क्रांतिसूर्य महात्मा जाेतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागाने 1 सप्टेंबर ते 31 मार्च 2027 या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात ‘महात्मा जाेतिराव फुले महसूल लाेक अदालत अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे लाखाे पक्षकारांना अर्धन्यायिक न्यायालयांच्या फेऱ्या, वेळ वाचून माेठा दिलासा मिळणार आहे. महसूल विभागाने या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. या अभियानांतर्गत महसूल प्रशासनातील सर्वांत खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या सर्व अर्धन्यायिक न्यायालयांत प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा व अपिलांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयांतील प्रलंबित दाव्यांचा तडजाेडीने निपटारा केला जाईल.
 
या अभियानादरम्यान दर तीन महिन्यांतून एकदा मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी, अशा सर्व स्तरांवर महसूल लाेक अदालत आयाेजित करणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
 
अभियानाचा लाभ राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचावा, यासाठी सर्व तहसील, उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर आणि फलकांवर माहिती प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कार्यालयांतही याचे फलक लावण्यात येतील. अभियानाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.