नागपूर, 20 ऑगस्ट (आ.प्र.) :
गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव (गाेवा)- नागपूर मार्गावर विशेष गाड्या साेडण्याचा निर्णय घेतला आहे. काेकण रेल्वेच्या समन्वयाने या गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या हाेणार असून, प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 01140 मडगाव- नागपूर विशेष गाडी मडगावहून दर मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री 9.25 वाजता नागपूरला पाेहाेचेल.
अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन 18 ऑगस्ट, 25 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला या गाडीच्या तीन फेऱ्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक 01139 नागपूर- मडगाव विशेष नागपूरहून दर बुधवारी रात्री 11.45 वाजता सुटेल. ही गाडी शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता मडगावला पाेहाेचेल. 19 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबरला या गाडीच्या तीन फेऱ्या नियाेजित आहेत. त्यामुळे काेकणातून नागपूरकडे परतणाऱ्या प्रवाशांनाही पर्यायी सेवा उपलब्ध हाेणार आहे.
गणेशाेत्सवाच्या काळातील गर्दीचा विचार करून मडगाव-नागपूर विशेष गाडी 8, 15 आणि 22 सप्टेंबरला धावणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर- मडगाव विशेष गाडी 9, 16 आणि 23 सप्टेंबरला चालवण्यात येईल.
त्यामुळे गणेशाेत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या आणि उत्सवानंतर परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळणार आहे. करमळी, थिवीम, सावंतवाडी राेड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी राेड, राजापूर राेड, रत्नागिरी, संगमेश्वर राेड, चिपळूण, खेड, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक राेड, भुसावळ, मलकापूर, अकाेला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा या स्थानकांवर या गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत.