रजाेगुणी म्हणजे आपणासारख्या मध्यममार्गी प्रापंचिकांचे वर्णन मागील समासात केल्यानंतर या सहाव्या ‘तमाेगुणलक्षण’ नावाच्या समासात श्रीसमर्थ दुष्टाव्याने, नीचपणाने वागणाऱ्या कुकर्मी माणसांच्या वर्तणुकीचे वर्णन करीत आहाेत. अशी माणसे पूर्णपणे इंद्रियांच्या आणि वासनांच्या आधीन झालेली असतात.
काय याेग्य आणि काय अयाेग्य, काय करावे आणि काय करू नये हा सारासार विचार त्यांनी गमावलेला असताे. खरं सांगायचं तर विचार या शब्दापासूनही ही मंडळी दूर असतात. मनात येईल ते काेणतेही कृत्य अविचाराने करण्यास ती मागेपुढे पाहात नाहीत. राग आला तरी ते आईवडील, मित्र, पुत्र काहीही न पाहता मारहाण करतात. अंगात आळस भरलेला असताे. दुसऱ्यासाठी देह झिजवणे लांबच; पण स्वत:ची कामेही दुसऱ्याने करावी असा त्यांचा आग्रह असताे. त्यांना भांडणाची, मारहाणीची अनावर खुमखुमी असते. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देण्यास, वेळप्रसंगी त्याचा प्राण घेण्यासही ते कचरत नाहीत. बेताल बाष्कळ बडबड, अनावर खादाडपणा, प्राणिमात्रांशी माणुसकी साेडून वर्तन, विश्वासघात, परपीडा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये असतात.